महिलांच्या आरोग्याकडे लक्ष देणे आज खूप महत्त्वाचे आहे. कारण कुटुंबाची काळजी घेणारी महिला कायम आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते,ती जागृत व्हावी आणि समाजात हे त्यांच्या विषयी आरोग्याबाबत संवेदनशीलता निर्माण व्हावी हे गरजेचे आहे. आहार,चांगल्या सवयी,योगा आणि वैद्यकीय सल्ला या त्रिसूत्रीवर महिलांचे आरोग्य टिकणे आवश्यक आहे.समाजातील रूढी, परंपरा, अंधश्रद्धा,वैद्यकीय सुविधांचा अभाव आणि वैयक्तिक आरोग्याकडे दुर्लक्ष इत्यादी कारणामुळे महिला आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे.
महिलांमध्ये आजाराचे प्रमाण वाढत आहे. वैद्यकीय कारणानुसार वीस ते तीस वर्षं हे वय प्रसूतीसाठी योग्य असते. पूर्वी प्रत्येक स्त्रीला पाच ते सहा वेळा बाळंतपणाच्या दिव्यातून जावे लागत होते. घरगुती बाळंतपणात कधी मातेचा जीव जात असे.आता शस्त्रक्रिया मध्ये रक्तस्राव झाला तर रक्त पुरवण्याची सोय असल्याने माता मध्ये माता मृत्यु व बाल मृत्यू चे प्रमाण कमी झाले आहे. सध्याच्या बदलत्या जीवन शैलीमुळे स्तनांचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग या आजारांना महिलांना तोंड द्यावे लागत आहे.
आज महिला चुल आणि मूल या पलीकडे गेल्या आहेत.घराबाहेर पडून स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.ह्या धकाधकीच्या जीवनात महिलांनी कामासोबत आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात.शहरातील सुमारे तीस टक्के महिलांना स्तनाचा कॅन्सरचा धोका आहे. स्त्रीयांमध्ये संधिवात, डायबिटीस, उच्च रक्तदाबाच्या तक्रारी वाढत आहेत.
स्त्रियांचे मानसिक आरोग्य,जननसंस्थेचे आजार व कॅन्सर आणि रजोनिवृत्तीच्या वेळी होणारा त्रास आदीबाबत महिलांनी आरोग्यविषयक उपक्रम जागरुकपणे राबविल्यास अनेक महिला आपला जीव,प्राण वाचवू शकतात.आपल्याकडे अनेक स्त्रियांना चाळीसच्या आत त्यांना त्रासदायक सांधेदुखीचा त्रास चालू होतो. स्त्री आरोग्य बाळंतपण एवढ्यावरच मर्यादित न राहता स्त्रियांच्या आरोग्याचा सर्वांगीण विचार करणे गरजेचे आहे.
महिलांचा आहार
सध्या सर्व क्षेत्रांमध्ये स्त्रिया हिरिरीने भाग घेत आहेत. प्रगती करत आहेत. राजकारण,शिक्षण,सरकारी नोकरी या सर्व ठिकाणी स्त्रियांसाठी आरक्षण आहे. घराबाहेर सर्व क्षेत्रे काबीज करणाऱ्या स्त्रिया घरांमध्ये स्वतःकडे किती हिरिरीने पाहतात, स्वतःच्या आरोग्य,आवडीनिवडी यांना किती महत्त्व देतात? जरी अर्ध्या आयुष्य स्वयंपाक घरात जात असले तरी सर्वांचे जेवण झाल्यानंतर उरेल तेच खायच आणि काही वाया जाऊ द्यायचे नाही म्हणून संपवायच,या मानसिकतेतून आजची स्त्री एकविसाव्या शतकात देखील बाहेर येत नाहीये.
जेव्हा आपण सकाळी उठतो, तेव्हा आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी जागी होते. त्याला भूक लागलेली असते आणि तिला काम ही करायच असतं.त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या लवकरात लवकर दुध घेणे किंवा DryFruits खाल्ले पाहिजे आणि चहा हा त्यावरचे उत्तर नाहीच,यामुळे भूक याची भावना विसरून जाते. आपण नाष्टा पुढे ढकलतो.सकाळी लवकर नाष्टा केला तर दिवसभरात अचानक भूक कमी लागते व पित्त होणे या गोष्टीचा त्रास होत नाही. नाश्त्यामध्ये बाहेरून आणलेले ब्रेड,बिस्कीट वगैरे पदार्थ खाण्यापेक्षा घरी बनवलेल्या एखादा धान्याचा पदार्थ खाल्ल्यास उत्तम.
दुपारच्या जेवणामध्ये भात,वरण,भाकरीसोबत हिरव्या पालेभाज्या,डाळी उसळी,ताक,दही अशा पदार्थांचा समावेश असू द्या.मुले नवरा घराबाहेर आहेत किंवा तिकडेच जेवतात म्हणून कितीतरी स्त्रिया स्वतःसाठी स्वयंपाक करण्याचा आणि खाण्याचा कंटाळा करतात. जेवणाची एखादी वेळ सोडल्यास आपले दैनंदिन पोषण मुल्यांची गरज पूर्ण होणार नाही हे लक्षात घ्यायला पाहिजे. संध्याकाळी चिप्स,चिवडा या गोष्टीपेक्षा सुकामेवा,फळे,लाह्या,गुळशेंगदाणे,फुटाणे अशा पदार्थांचे सेवन करावे.रात्रीचा आहार शक्यतो हलका असावा.
त्यामधे तळलेले पदार्थ,गोड पदार्थ, खाणे टाळावे.अंडी,मासे करण्यासाठी संध्याकाळची वेळ योग्य ठरते.आपला आहार हे आपले इंधन आहे हे ध्यानात घेऊन प्रत्येक स्त्रीने आजाराविषयी काळजी घेतली पाहिजे.
योग आणि महिला
महिला सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मुलांच्या,पतीच्या आणि इतर कौटुंबिक सदस्यांच्या सेवेत स्वतःला गुंतवून घेतात.महिला कुटुंबाविषयी नितांत समर्पणाची जबाबदारी पार पाडतात. पण हे सर्व करताना पुरेश्या व्यायामाअभावी स्वतःच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष होत जाते आणि मग वाढत्या वयानुसार आरोग्याच्या समस्या भेडसावतात.आरोग्याच्या तक्रारी वाढतात.
अंगावर दुखणे काढल्याने समस्या अजून जटिल होत जातात आणि मग कुटुंबाच्या देखभालीत कमी पडल्याने मानसिक ताणतणाव वाढत जातो आणि स्वभाव चिडचिडा होणे,राग येणे सुरू होते.मग मानसिकदृष्टया महिलेमध्ये एकटेपणाची भावना वाढून जाते.त्यामध्ये डिप्रेशन येते, मग या सर्वांमधून बाहेर पडण्यासाठी जो वैद्यकीय खर्च करावा लागतो तो निराळाच.पण मग हे सर्व टाळू शकत नाही का? तर नक्कीच टाळू शकतात.यासाठी महिलांनी थोडा स्वार्थी होणे गरजेचं असतं त्यांनी स्वतःला पण वेळ द्यावा.
पुरेसा व्यायाम करावा,चालणे, योग करणे इत्यादी व्यायाम प्रकार करावेत किंवा स्वतःच्या जीवन शैलीचा तो एक भाग बनवून घ्यावा. रोज अर्धा ते एक तास योगा केल्याने तर महिलांच्या अनेक समस्या सुटू शकतात. वाढते वजन नियंत्रणात येते.सांध्यांचा त्रास, गुडघेदुखी,श्वसनाचे विकार बरे होतात. वाढते शुगर, कोलेस्ट्रॉल,गर्भाशयाच्या तक्रारी इत्यादी वर योग वरदान म्हणून सिद्ध झाला आहे.
अनेक आजार तर हार्मोन्स इनबॅलन्सने सुरू होतात. योगा तर ह्या सर्वांच्या मुळावर घाव घालत असल्याने या समस्या सराईतपणे बऱ्या होतात.आसन,प्राणायाम,सूर्यनमस्कार, व्यायाम केल्याने मात्र महिला चांगले घरकाम करू शकतात.म्हणूनच समस्या निर्माण होण्याआधी सावध होणे गरजेचे असते. म्हणून प्रत्येक स्त्रीने योगाला महत्व देऊन आपले आरोग्यपूर्ण जीवन जगावे.
* आरोग्य तज्ज्ञ *
वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु)
वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु)
श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिक
कोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर क्रमांक 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-411044
शाखा- मुंबई- कोपरखैरणे । दादर.
पुणे- निगडी ।बाणेर । मोशी.