गुडीपाडवा
चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी गुढीपाडवा साजरा केला जातो. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. त्यामुळे नवीन उद्योगाचा,व्यवसायाचा किंवा कोणत्याही नवीन कामाचा आरंभ करण्यास हा मुहूर्त शुभ मानला जातो. गुढीपाडव्याला नवीन वर्ष म्हणून देखील ओळखले जाते. या दिवशी गुढी उभारुन नव्या संकल्पाचा शुभारंभ केला जातो. चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा होय.
हाच वर्षांरंभाचासुद्धा दिवस असल्यामुळे खगोलीय गणितानुसारदेखील या दिवसाला विशेष महत्त्व आहे.
गुढीपाडवा साजरा करण्याचे कारण
याचे उत्तर दडले आहे शालीवाहन राजवटी मध्ये! शालिवाहन ह्या राजाने शालिवाहन शकास सुरुवात केली आणि या शकाची सुरुवात अर्थात आरंभ म्हणजेच गुढीपाडवा होय. शक सुरु करणारा पहिला महाराष्ट्रीयन राजा म्हणून आजही शालिवाहन राजाचे महत्त्व आहे. या दिवशी पंचाग वाचन करून आणि देवी सरस्वतीचे पूजन करून हिंदू नववर्षाचे स्वागत करण्याची प्रथा आहे. गुढीपाडवा साजरा करण्याचे एक कारण महाभारतामध्ये सुद्धा सापडते. यानुसार महाभारतातील आदिपर्वामध्ये उपरीचर नामक राजाने इंद्रामार्फत त्याला मिळालेली कळकाची काठी इंद्राला नमन म्हणून जमिनीमध्ये रोवली आणि दुसऱ्या दिवशी त्या काठीची पूजा केली. हा दिवस होता नवीन वर्षाचा पहिला दिवस. याच दिवशी ब्रम्हदेवाने सृष्टीची निर्मिती केली म्हणून गुढीपाडवा साजरा करतात अशी आख्यायिका सुद्धा आहे.
गुढी कशी सजवतात?
तसं तर प्रत्येक प्रांतानुसार गुढी सजवायची पद्धत वेगळी असते. पण सामान्यत: एक समान पद्धत सुद्धा दिसून येते. ज्यानुसार नवीन वर्षाचे स्वागत म्हणून एका उंच काठीला रेशमी साडी व भरजरी खण घेऊन त्याची घडी बांधली जाते. नंतर त्या काठीवर चांदीचा वा अन्य धातूचा तांब्या उपडा ठेवला जातो. आंब्याची पाने व कडूनिंबाची डहाळी देखील त्यावर बांधून गुढी अधिक सुंदर सजवली जाते. शेवटी फुलांचा हार आणि अत्यंत विशिष्ट अशी साखरेच्या गाठीची माळ चढवली जाते.
गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंब घालून बनवलेल्या मिश्रणाचे महत्त्व
गुढीपाडव्याच्या प्रसाद म्हणून कडूनिंबाची पाने-मोहर, धणे आणि गुळ यांचा विशेष योग तयार करण्याची पारंपारिक प्रथा आहे. यामध्ये गुळ हा चवीने गोड आणि गुणाने उष्ण असल्याने शरीरातील दुष्ट कफाचा नाश करून शरीरस्थ जठराग्नी सुस्थितीत राखायला मदत करतो. पातळ झालेल्या दुष्ट कफामुळे शरीरात अनेक प्रकारच्या कृमींची उत्पत्ती होते. या स्थितीत कृमीनाशक, कफदोषशामक, रक्तशोधन करणार्या गुणांचा कडुनिंब वापरण्याचा शास्त्रादेश असल्याने शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. धणे हे पित्तशामक, दाहशामक, शरीराला थंडावा देणारे आहे .
गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंब आणि अन्य पदार्थ एकत्रित करून मिश्रण सिद्ध (तयार) केले जाते. या दिवशी मिश्रणासाठी कडुनिंबाचाच वापर करण्यामागील शास्त्र या लेखाच्या माध्यमातून समजून घेऊया.जो यजमान आहे त्याला ते रोगशांती, व्याधींचा नाश व्हावा आणि सुख, विद्या, आयुष्य, लक्ष्मी (संपत्ती) लाभावी म्हणून भक्षण करण्यास सांगितले आहे.कडुनिंब घालून बनवलेले मिश्रण ग्रहण केल्यावर मुखाद्वारे चैतन्याचा प्रवाह देहात प्रक्षेपित होतो..
!!गुडीपाडव्याच्या आरोग्यदायी शुभेच्छा !!
* आरोग्य तज्ज्ञ *
वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु)
वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु)
श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिक
कोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर क्रमांक 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-44